Metro Development India
मुंबई : देशातील मेट्रोचे जाळे 1 हजार किलोमीटरच्यावर गेल्याने जगात भारतीय मेट्रो तिसर्या क्रमांकावर पोहोचली आहे. 2006 साली देशात 81 किमी मेट्रो मार्गिका सुरू झाल्या. त्यानंतर हे जाळे झपाट्याने विकसित करण्यात आले. देशात सध्या 11 राज्यांतील 23 शहरांमध्ये मेट्रो धावत असून दररोज जवळपास एक कोटी प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतात.
गेल्या 11 वर्षांत मेट्रो मार्गिकांच्या निर्मितीला वेग मिळाला आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा यांमुळे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली मेट्रो शहरी वाहतुकीचा कणा बनत चालली आहे. भारताने मेट्रो प्रकल्पांमध्ये 2022 सालीच जपानला मागे टाकले. आता केवळ चीन आणि अमेरिका हेच देश भारताच्या पुढे आहेत.
भारतात मेट्रो सुरू करण्याचा विचार 1969 सालापासून सुरू होता. 1984 साली कोलकातामध्ये पहिली मेट्रो सुरू झाली. पुढील काळात बंगळुरू आणि दिल्ली येथेही मेट्रो सुरू झाल्या; पण मेट्रो मार्गिकांच्या निर्मितीला फार वेग नव्हता.
2014 सालापर्यंत भारतात दर महिन्याला केवळ 600 मीटरपर्यंत मेट्रोचे रूळ टाकले जात होते. आता मात्र यात दहापटींनी वाढ झाली आहे.
सध्या दर महिन्याला 6 किमीचे मेट्रो रूळ टाकले जात आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथे मेट्रो मार्गिका विस्तारत आहेत. दुसर्या बाजूला पुणे, कानपूर, आग्रा येथेही मेट्रो मार्गिका सुरू होत आहेत.
एकट्या दिल्लीत 2026 सालापर्यंत 450 किमीपेक्षा अधिक मेट्रो मार्गिका सुरू होतील. बंगळुरूत 76 किमी, हैदराबादमध्ये 69 किमी आणि चेन्नईमध्ये 54 किमी मार्गिकांचे काम वेगाने सुरू आहे.
जयपूरमध्ये 11 किमी, कोचीमध्ये 28 किमी, नागपूरमध्ये 38 किमी, लखनऊमध्ये 22 किमी आणि पुण्यामध्ये 33 किमी मेट्रो मार्गिका नियोजित आहेत.
2024मध्ये 1 हजार किमी नव्या मेट्रो मार्गिकांचे बांधकाम सुरू होते. आणखी 12 हजार कोटींचे प्रकल्प नियोजित आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास पुढील दशकभरात आणखी 1 हजार किमी मेट्रो मार्गिका सुरू होतील.
वर्सोवा-घाटकोपर ही 12.4 किलोमीटरची मुंबईतील पहिली मेट्रो 2014 साली सुरू झाली. या वर्षाच्या अखेरीस मेट्रो 4, मेट्रो 4 अ आणि मेट्रो 9 या मार्गिका सुरू होणार आहेत.
दहिसर ते डीएननगर मेट्रो 2 अ मार्गिका 18.6 किमीची असून ते 2022 साली सुरू झाली. त्यासोबतच दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 ही 16.5 किमीची मेट्रो मार्गिका सुरू झाली.
मुंबईची भुयारी मेट्रो 33.5 किमी लांबीची आहे. त्यापैकी आरे ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा सुरू झाला आहे. उर्वरित मार्गिका ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.
नवी मुंबईत सिडकोने 2023मध्ये बेलापूर ते पेंधर अशी 11.1 किलोमीटरची मेट्रो मार्गिका सुरू केली असून आणखी तीन मेट्रो मार्गिकांचे काम प्रगतिपथावर आहे.