

मुंबई : गृह मंत्रालयाने आता व्हिसाच्या श्रेणींमध्ये बदल करत 'जी-२० टॅलेंट व्हिसा' ही नवी श्रेणी आणली आहे. या श्रेणीनुसार आता जी-२० देशांमधील विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि संशोधक यांना भारतात येणे सोपे होणार आहे. भारतीय विद्यापीठांच्या संघटनेने (एआययू) भारतीय विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी आख- लेल्या कार्यक्रमाला हा निर्णय पूरक ठरणार आहे.
जागतिक पातळीवरील प्रमुख देशांमध्ये आर्थिक सहकार्य व्हावे, या प्रमुख हेतूने स्थापन झालेल्या जी-२० समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, G20 इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्किये, युके, अमेरिका या १९ देशांचा समावेश आहे. त्याशिवाय युरोपियन युनियनही या समुहाचा भाग आहे. या देशांमधील शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक आदींना भारतात नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमांमध्ये, प्रकल्पांमध्ये, प्रशिक्षणात रस असल्यास त्यांना आता भारतात येणे सुलभ होणार आहे. सध्या भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये ४९ हजारांच्या आसपास आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. ही संख्या वाढवण्याचे लक्ष्य ठेवले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे भारतीय विश्वविद्यालय संघा (एआईयू) च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांनी सांगितले. देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांच्या आत असताना परदेशात शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १० ते १२ लाख एवढी प्रचंड आहे. भारतीय बुद्धिमत्तेचा परदेशाकडे जाणारा हा ओघ थांबवण्यासाठी आणि परदेशातील विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी एआययू भारतीय विद्यापीठांची आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांचा दर्जा उंचावणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असेही डॉ. मित्तल यांनी नमूद केले.
यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व महाविद्यालयांचे प्राचार्य यांना परिपत्रकातून माहिती दिली आहे. या निर्णयामुळे आपल्या विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम, पोस्ट-डॉक्टरल संशोधन, फेलोशिप इत्यादींच्या उद्देशाने बाहेरचे विद्यार्थी भारतात प्रवेश घेतील, असे म्हटले आहे. परदेशी विद्यार्थ्यांची भारतातील संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.