

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगातील 38 राष्ट्रांसोबत भारताच्या मुक्त व्यापार करारांची वाटचाल सुरू झाली असून जागतिक व्यापार क्षेत्राचा 70 टक्के भाग भारतासाठी खुला झाला आहे. भारतासाठी सर्वतोपरी लाभदायक ठरणाऱ्या या करारातून देशाचे संपूर्ण हित जपले जाईल. शेतकरी अथवा अन्य कोणत्याही क्षेत्राच्या हिताला बाधा येणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेमध्ये कोणतीही शक्ती बाधा आणू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये शनिवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगताना गोयल यांनी मुक्त जागतिक व्यापार करारावर भाष्य केले. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश प्रचंड आत्मविश्वासाने वाटचाल करत असून भारत आपल्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसमध्ये नैराश्य दाटले असून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याखेरीज त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, कोणतेही प्रस्ताव नाहीत. अपप्रचार करून केंद्र सरकारवर टीका करण्याखेरीज कोणताही मुद्दा काँग्रेसकडे नसल्याचे सांगत एकामागून एक खोटे पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात असल्याचा आरोप गोयल यांनी केला. मात्र राहुल गांधी यांच्यासारखा नेता आणि त्यांच्या आघाडीस जनतेने नाकारलेले पाहता त्यांचे हे नैराश्यग्रस्त प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थसंकल्पाचा थेट लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे. तीन नवे केमिकल पार्क, टेक्स्टाईल पार्क, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे प्रकल्प, ‘सब का साथ, सब का विकास’ या ध्येयानुसार देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास या कर्तव्यभावनेतून अर्थसंकल्पाची मांडणी केली असून महाराष्ट्राला या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याचा दावाही गोयल यांनी केला.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 24 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देणाऱ्या योजनांद्वारे पुणे, नागपूरमध्ये ग्रोथ हबच्या रूपाने येत्या पाच वर्षांत विकास साधला जाणार असून प्रत्येक शहरासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक पैलूमध्ये महाराष्ट्राचा लाभ आणि महाराष्ट्राचे योगदान प्रतिबिंबित असल्याचे गोयल म्हणाले.