नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आवक घटल्याने हिरवी मिरची महागली असतानाच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा बसताच लिंबूच्या मागणीत वाढ झाल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लिंबू ४० ते ५० रुपये किलो होते. तेच दर शनिवारी ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचले, तर किरकोळ बाजारात तीन लिंबू २० रुपये म्हणजेच एक किलो लिंबूसाठी १३५ ते १४० रुपये मोजावे लागणार आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात लिंबूला मोठी मागणी असते. राज्यातून आणि परराज्यातून लिंबूची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मात्र यावर्षी राज्यातून होणारी आवक कमी झाल्याने मद्रास राज्यातून सध्या लिंबूची आवक सुरु आहे. २१ फेब्रुवारी रोजी एपीएमसीत ३० ते ३५ रुपये किलो असे लिंबूचे दर होते, तेच दर २५ आणि २६ फेब्रुवारीला ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचले.
या दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून आला. रविवारी किरकोळ बाजारात तीन लिंबू खरेदी करण्यासाठी २० रुपये ग्राहकांना मोजावे लागले. मार्चमध्ये या दरात आणखी वाढ होईल. लिंबाचे दर वाढल्यामुळे लिंबू सरबतच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. महिन्याकाठी सुमारे ७ ते ७५०० क्विंटल म्हणजे एका दिवसाला सरासरी २०० ते २५० क्विंटल माल एपीएमसीत येतो. मार्चनंतर ही आवक परराज्यातून वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात स्थानिक बाजारात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती जेमतेम एक गोणी लिंबूचे २५० ते ३०० रुपये • पडतात. हेच लिंबू दलाल खरेदी करुन घाऊक बाजारात विक्रीसाठी पाठवतो आणि एका गोणीचे सुमारे ७०० ते ८०० रूपये कमवतो.