

मुंबई : माझा एकुलता एक मुलगा होता. त्याला न्याय मिळाला पाहिजे. संचालक आणि संबंधित प्राध्यापाकांना तातडीने अटक करा, चौकशी करा आणि आम्हाला न्याय द्या, असा आक्रोश करत आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आई-वडिलांनी गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले.
साहिलच्या मृत्यूप्रकरणी न्यायाची मागणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले वडील रवींद्र वाकोडे, आई सोनाली वाकोडे यांना सकाळी पवईकडे जात असताना भांडुपमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी नेण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या बैठकीनंतर पालकांनी थेट आझाद मैदान गाठत आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. निखिल कांबळे आणि ॲड. सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते.
आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा पालकांचा निर्धार होता. मात्र, ते पवईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सुमारे दीड तास भांडुपमधील पोलिस ठाण्यात ठेवले. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांसोबत भेट घडवून आणण्यासाठी त्यांना सह्याद्री अतिथीगृहात नेण्यात आले.
आयोगासोबतची बैठक संपल्यानंतर साहिलच्या पालकांनी आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आझाद मैदान गाठले.
साहिलला न्याय मिळावा, प्राध्यापक प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारें यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना तातडीने अटक करावी, सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी पालकांनी आंदोलन सुरू केले आहे.
माझा मुलगा आत्महत्या करणारा नव्हता. जर तो आत्महत्या करणार होता, असे म्हणत असतील तर त्याच्या आयुष्यात नेमके काय घडले, हे समोर आले पाहिजे. केवळ काही मिनिटांचे फुटेज दाखवून सत्य समोर येणार नाही. साहिल वस्तीगृहातून निघाल्यापासून त्याचा मृतदेह नेदीपर्यंतचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा, अशी मागणी रवींद्र वाकोडे यांनी आझाद मैदानात केली.
चौकशीला आमचा विरोध नाही. मुंबई क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरू आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळ जाऊ नये. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना अटक करूनही चौकशी करता येते. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका रवींद्र वाकोडे यांनी मांडली. क्राईम ब्रँचकडून सुरू असलेल्या तपासाबाबत आपण समाधानी आहोत. मात्र, हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणीही त्यांनी केली.
साहिलवर अभ्यास आणि परीक्षेच्या कारणावरून दबाव आणला जात असल्याची माहिती त्याने कुटुंबांना दिली होती, असा दावा वडिलांनी केला. उच्च जातीचा, खालच्या जातीचा म्हणून तुझा खोट्या गुन्ह्यात अडकवीन, अशी धमकी दिली जात असल्याचे साहिल सांगत होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे टीम लीडर म्हणून निवड झाल्याची आनंदाची बातमी त्याने कुटुंबांना दिली होती. ५० जणांच्या टीमसोबत रोबोटिक्सचे काम करणार असल्याचे त्याने सांगितले होते. आम्ही त्याचे अभिनंदन केले होते. त्याचे अचानक त्याने असे टोकाचे पाऊल उचलणे आम्हाला पटत नाही, असे रवींद्र वाकोडे म्हणाले.