

नूतन बांदेकर
‘प पर्यावरणाचा’च्या मागील भागात आपण अनिर्बंध वृक्षतोडीची कारणे आणि परिणाम याविषयी जाणून घेतले. त्यापैकी एक कारण होते रस्ते व घरांचे बांधकाम यासाठी होणारी वृक्षतोड. पर्यटन विकास तसेच वाहतूक विकास यासाठी नवनवे रस्ते, महामार्ग यांची आवश्यकता भासते, हे जरी खरं असलं तरी याचे पर्यावरणावर होणारे दूरगामी परिणाम अत्यंत भयावह आहेत हे देखील तितकंच सत्य आहे.
नैसर्गिक जंगलांचे रूपांतर रस्ते, बोगदे आणि इमारतींमध्ये केल्यामुळे जमिनीचा उपयोग मोठ्या प्रमाणात बदलला आहे. याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक जलप्रवाह व उगम आटल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. अनियंत्रित पर्यटन वाढीमुळे हॉटेल्स, होमस्टे, पर्यटक वाहने, आणि पार्किंगच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
ही वाढ अनेकदा पर्यावरण- संवेदनशील भागांमध्ये अतिक्रमणाच्या रूपाने घडते. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशात 2024 मध्ये एकूण 1,81,24,694 पर्यटकांची नोंद झाली. हंगामी पर्यटनाच्या लाटेमुळे पर्वतीय भागांतील मूलभूत सेवा व्यवस्था तणावाखाली येतात. अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यावरणावर अनेक परिणाम दिसून येतात. वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन हवामानाची गुणवत्ता घसरवते, त्याचवेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे हिमालयीन हिमवृष्टी लवकर वितळण्यास सुरुवात होते.
वाढती वाहतुकीची साधने हे ग्लोबल वॉर्मिंगचे एक सर्वात प्रमुख कारण आहे, कारण कार, ट्रक, जहाजे आणि विमाने जीवाश्म इंधन (पेट्रोल/डिझेल) वापरतात, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड (उज2) सारखे अनेक हरितगृह वायू उत्सर्जित होतात. जागतिक स्तरावर, वाहतूक क्षेत्र एकूण हरितगृह वायू उत्सर्जनाच्या अंदाजे 15% साठी जबाबदार आहे, ज्यामध्ये रस्ते वाहतुकीचा सर्वाधिक वाटा आहे.
वाहतूक आणि ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य पैलू :
हवामान बदलास हातभार : जीवाश्म इंधनामुळे उत्सर्जित होणारे वायू म्हणजे मिथेन, नायट्रस ऑक्साईड हे वातावरणात उष्णता रोखून धरतात, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते.
रस्ते वाहतूक : रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये वैयक्तिक कार आणि ट्रक हे ग्लोबल वॉर्मिंगचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. वैयक्तिक कारमधून होणारी वाहतूक ही किमान व्यक्तींसाठी असून, वातानुकूलन (अउ) व्यवस्थेचा वापर करणारी आहे. त्यामुळे दुहेरी प्रदूषण कार्बन म्हणजेच हरितगृह वायू (उऋउ) उत्सर्जन होत असते.
वाढते उत्सर्जन : गेल्या दशकात, इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वाहतूक क्षेत्रातून होणारे उत्सर्जन वाहनांची संख्या व रस्ते, महामार्ग वाढल्याने वेगाने वाढले आहे.
मालवाहतूक : मालवाहू ट्रक आणि जहाजे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय भर घालतात आणि नजीकच्या काळात हा दर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विमाने व जहाजे : अलीकडच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग, विमान वाहतूक व फायटर प्लेन, तसेच जलवाहतूक, युद्धनौका यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आपण पाहतो. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या या वाहतुकीमुळे अधिक प्रमाणात कार्बन म्हणजे सीएफसीचे उत्सर्जन थेट वातावरणात होते, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढते आणि ओझोनचे कवच कमकुवत होते.
वाहनांची देखभाल दुरुस्ती : वाहन कोणतेही असो, त्याची देखभाल आणि दुरुस्ती वेळच्यावेळी करणे हे वाहनधारकाचे कर्तव्यच आहे. कारण नादुरुस्त वाहनाने जसा अपघाताचा धोका वाढतो, तसाच नव्हे त्यापेक्षा अधिक प्रदूषणाचा राक्षस बळावतो. सदरच्या सर्व कारणांमुळे होणारे वायू प्रदूषण अर्थातच जागतिक हवामान प्रदूषणाचे दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीव सृष्टीला भोगावे लागत आहेत. हे पुढील काळात अधिक वाढणार आहेत, ही वस्तुस्थिती जगजाहीर आहे. मग एक जबाबदार घटक म्हणून आपण काय काय करू शकतो हे समजून घेणे व तसेच प्रत्यक्षात कृतीत आणणे हे आपले सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे.
उपाययोजना आणि शाश्वत वाहतूक
सार्वजनिक वाहतुकीचा वापर : बस, मेट्रो किंवा रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याने प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
ई-वाहने : (एश्रशलीींळल तशहळलश्रशी) जीवाश्म इंधनाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आवश्यक आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा धोका टळू शकेल.
सायकलिंग आणि चालणे : जवळच्या अंतरासाठी चालणे किंवा सायकलचा वापर करणे ही काळाची गरज आहे. काही युरोपीय देशांमध्ये हे अनिवार्य केले गेले आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
कार्यक्षम तंत्रज्ञान : इंधन कार्यक्षमता वाढवणे, हायब्रीड वाहने वापरणे आणि पर्यायी इंधनांचा (उदा. बायोफ्युएल) वापर करणे. वाहन खरेदी करताना किंवा वापरताना पर्यावरणपूरक पर्यायी वाहनांना प्राधान्य द्यावे.
सर्व प्रकारची वाहतूक ही हरितगृह वायूंमध्ये, विशेषतः कार्बन-डायऑक्साइड उत्सर्जनात प्रमुख योगदान देते. अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये पेट्रोलसारख्या पेट्रोलियम-आधारित उत्पादनांच्या ज्वलनामुळे, रस्त्यावरील वाहने सर्वात जास्त हवेचे प्रदूषण निर्माण करतात. तसेच जहाजे आणि विमानांमधून देखील हे क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) उत्सर्जन वाढतच आहे.
हे निश्चितपणे लक्षात येते. त्यासाठी वाहतूक क्षेत्रातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने विचार करून शाश्वत वाहतुकीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे देखील तितकेच गरजेचे आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही राहात असलो तरी, अल्प कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचा आणि पर्यावरणास अनुकूल मार्गांचा विचार कायम मनात जागा ठेवूया, तसा अवलंब स्वतःपासून नियमितपणे करूया.