

मुंबई : देशातील अव्वल शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईत यंदाच्या प्लेसमेंट हंगामाची एक डिसेंबरपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात विविध क्षेत्रांतील एकूण 42 कंपन्या कॅम्पसवर उपस्थित राहिल्या आणि त्यांनी एकूण 98 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या दा व्हिन्सी या कंपनीने सर्वाधिक अंदाजे 1.48 कोटी रुपयांचे वार्षिक वेतन दिले.
विद्यार्थ्यांच्या मते, पहिल्या दिवशी कॅम्पसवर उत्साहाचे वातावरण होते. 98 विद्यार्थ्यांची तत्काळ निवड झाली असून आणखी 70 विद्यार्थ्यांना अंतिम ऑफर मिळाल्या आहेत. तथापि या विद्यार्थ्यांनी पुढील काही दिवसांत अधिक आकर्षक ऑफर मिळू शकतात, या शक्यतेने अंतिम स्वीकृती थोडी पुढे ढकलली आहे. पहिल्या दिवशीच 98 निवडी, 70 जणांना अतिरिक्त अंतिम ऑफर मिळाल्याने उत्साह असल्याचे दिसून आले. फ्लिपकार्ट, जे. पी. मॉर्गन, बार्कलेज आणि क्वालकॉम यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर जीई, एअरबस आणि बार्कलेज यांनी नियोजित मुलाखतींसह वॉक इन मुलाखतीही राबवत स्पर्धा अधिक तीव्र केली होती.
कौशल्यधारकांचे वर्चस्व
आयआयटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या प्लेसमेंट मध्ये कंपन्यांचे लक्ष प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग (एमएल) आणि त्या संबंधित तंत्रज्ञानात प्रावीण्य असलेल्या उमेदवारांकडे आहे. तांत्रिक प्रगतीमुळे या कौशल्यांची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत असल्याने कंपन्या अशा तज्ज्ञांना आकर्षक पॅकेज देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यंदा डेव्हलपर पदांची मागणी यूजर इंटरफेस (यूआय) संबंधित पदांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे दिसत आहे. मात्र अजून हंगाम असल्याने यात आणखी बदल होणार असल्याचेही दिसून येईल.
प्रथमच इंटर्नशिप प्लेसमेंटचे संयोजन
यंदा आयआयटी मुंबईत प्रथमच प्लेसमेंटसोबतच आंतरवासित (इंटर्नशिप) या प्रकारची संयुक्त प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक कंपन्या प्लेसमेंट हंगामात सहभागी झाल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक व्यापक बनली आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट माहिती पुस्तिकेनुसार संस्थेतील विविध अभ्यासक्रमांमधील 2300 पेक्षा अधिक विद्यार्थी या वर्षी प्लेसमेंट प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून विशेष प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.