IIT Bombay Exam Rules: आयआयटी मुंबईचा मोठा निर्णय! परीक्षा गैरप्रकारांचे कठोर नियम स्थगित; विद्यार्थ्यांना मिळणार बाजू मांडण्याची संधी

जुलै २०२६ मधील कठोर नियम स्थगित; कारवाईपूर्वी विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी, नव्या एसओपीची तयारी सुरू
IIT Bombay
IIT BombayPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: आयआयटी मुंबईतील परीक्षा गैरप्रकारांच्या प्रकरणांवर कारवाई करण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आणि परीक्षा गैरप्रकार हाताळण्याच्या पद्धतीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या सिनेटने जुने निर्णय पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै २०२६ मध्ये लागू करण्यात आलेले सर्व नियम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुमारे अडीच तास चाललेल्या आयआयटी मुंबईच्या सिनेटच्या बैठकीत प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

IIT Bombay
Home Loan EMI: घर घेण्याचे स्वप्न महागणार! रेपोदर वाढला; गृहकर्जाचा ईएमआय तब्बल ३ हजारांनी वाढण्याची शक्यता

बैठकीत विद्यार्थ्यांना शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. २०१५च्या प्रक्रियेनुसार परीक्षा गैरप्रकाराचा संशय असलेल्या विद्यार्थ्याची संबंधित सामग्री ताब्यात घेऊन त्याला स्वतंत्र उत्तरपत्रिकेवर परीक्षा पूर्ण करण्याची संधी दिली जात होती.

त्यानंतर घटनेचा अहवाल तयार करून तो विभागप्रमुखांकडे पाठविला जात असे, आणि पुढे विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कारवाई समितीकडून प्रकरणाची तपासणी केली जात होती. २०१५च्या नियमांमध्ये प्रत्येक कॉपीच्या प्रकरणात निलंबनाची सक्तीची तरतूद करण्यात आली नव्हती.

सामूहिक कॉपी, वारंवार गैरप्रकार किंवा तोतयागिरीसारख्या गंभीर प्रकरणांमध्येच निलंबनासारखी कठोर कारवाई केली जात होती. गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षा निश्चित केली जात होती. पुरावे स्पष्ट नसल्यास विद्यार्थ्याला संशयाचा लाभ देण्याची तरतूदही या प्रक्रियेत करण्यात आली होती.

गैरप्रकाराचा आरोप झाल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी पर्यवेक्षक किंवा संबंधित प्राध्यापकाला घटनेची संपूर्ण माहिती नमूद करणारा स्वतंत्र फॉर्म भरावा लागणार आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यालाही घटनेबाबत आपली बाजू नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे.

IIT Bombay
Mumbai Water Shortage: मुंबईकरांना पाणी मिळेना, पण रस्ते धुण्यासाठी २१३ टँकर! महिन्याला ३६ कोटी लिटर पाणी खर्च होणार

मात्र विद्यार्थ्याने हा फॉर्म भरणे बंधनकारक राहणार नाही. विद्यार्थी इच्छित असल्यास आपले म्हणणे नोंदवू शकतो किंवा फॉर्म भरण्यास नकार देऊन आपली बाजू इतर पद्धतीने आपली बाजू विद्यार्थी मांडू शकणार आहे.

परीक्षा गैरप्रकार हाताळण्यासाठी अधिक स्पष्ट आणि निश्चित कार्यपद्धती तयार करण्याचे कामही सुरू आहे. यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे समान प्रतिनिधित्व असलेली समिती प्रस्तावित मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करीत आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना औपचारिक शिस्तभंग कारवाईपूर्वी मार्गदर्शक तसेच मानसिक आरोग्य आणि कल्याणविषयक मदतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे.

१८ सप्टेंबर रोजी परीक्षा गैरप्रकाराच्या कथित घटनेनंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले होते. परीक्षा गैरप्रकाराच्या प्रकरणात विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागले जाते, याबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित करून नियमांमध्ये बदलाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जुलै २०२६ मध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचाही फेरआढावा घेण्यात आला आहे.

सिनेटने याच बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रकही मंजूर केले. त्यानुसार १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान सलग १३ दिवस परीक्षा होणार असून, या कालावधीत शनिवार आणि रविवारही परीक्षांचे दिवस असणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news