Grass Based Plastic : रानटी गवतापासून पर्यावरणपूरक मजबूत प्लास्टिक

आयआयटी मुंबईच्या संशोधनाला नवे पेटंट, मो‍ठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता
Grass Based Plastic
रानटी गवतापासून पर्यावरणपूरक मजबूत प्लास्टिकpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : रानटी गवतापासूनही मजबूत आणि पर्यावरणपूरक प्लास्टिक तयार होऊ शकते, हे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी सिद्ध करून दाखवले आहे. मुंजा आणि दुर्वा या सहज उपलब्ध गवताच्या तंतूंपासून विकसित करण्यात आलेल्या नव्या संमिश्र पदार्थाला अनेक पेटंट मिळाले आहे. वाहन उद्योग, बांधकाम, फर्निचर, पॅकेजिंग आणि ३डी प्रिंटिंग क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

आजच्या औद्योगिक युगात उत्पादन क्षेत्रात सिंथेटिक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी किंमत, अधिक मजबुती आणि टिकाऊपणा यामुळे पॅकेजिंगपासून वाहन उद्योगापर्यंत सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. मात्र प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे लँडफिल्स आणि महासागरांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.

Grass Based Plastic
White Jamun Benefits: पांढऱ्या जांभळांनी घातली खवय्यांना भुरळ

फायबरग्लास आणि कार्बन फायबरसारख्या कृत्रिम तंतूंनी मजबूत केलेल्या प्लास्टिकचे पुनर्चक्रणही खर्चिक आणि अवघड असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यायांची गरज अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका अपर्णा सिंग, संशोधक नितीन कुमार आर्य आणि त्यांच्या संशोधन गटाने नैसर्गिक तंतूंचा वापर करून शाश्वत संमिश्र पदार्थ विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या संशोधनातून शेतीतील टाकाऊ पदार्थ, स्थानिक पातळीवर उपलब्ध गवत आणि पुनर्चक्रणयोग्य पॉलिमर यांचे मिश्रण करून पर्यावरणपूरक तसेच उच्च कार्यक्षमतेचे पदार्थ तयार करण्यात आले आहेत.

स्थानिक रानटी गवताचा वापर करून अधिक मजबूत, हलके, पुनर्चक्रणयोग्य आणि पर्यावरणपूरक संमिश्र (कॉम्पोझिट) पदार्थ विकसित करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. मुंजा आणि दुर्वा किंवा बर्म्युडा गवत यांसारख्या सहज उपलब्ध नैसर्गिक तंतूंचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाला अनेक पेटंट मिळाले आहेत. संशोधन पथकाने पुनर्चक्रणयोग्य उच्च घनता पॉलीइथिलीन (एचडीपीई)मध्ये नैसर्गिक तंतू मिसळून नवे कॉम्पोझिट तयार केले आहे. हे पदार्थ पारंपरिक ग्लास फायबर संमिश्र पदार्थांपेक्षा हलके, कमी खर्चिक आणि अधिक शाश्वत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

Grass Based Plastic
Forest fire prevention technology |जळताहेत पृथ्वीची फुफ्फुसे...

या गवतापासून काय होऊ शकते?

  • वाहनांचे आतील भाग, डॅशबोर्ड, बंपर, बांधकाम साहित्य, फर्निचर, पॅकेजिंग आणि ३ डी प्रिंटिंगमध्ये होऊ शकतो.

  • संशोधनादरम्यान दूर्वा गवतावरील नैसर्गिक मेणाचा थर काढून तंतूंची प्लास्टिकशी जोडणी अधिक मजबूत करण्यात आली.

  • मुंजा तंतू आणि इपॉक्सी रेझिनच्या साहाय्याने विकसित करण्यात आलेल्या पदार्थाच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

  • या तंत्रज्ञानामुळे इंजेक्शन मोल्डिंग, ३डी प्रिंटिंग आणि इतर उत्पादन प्रक्रियांमध्ये एकाच नैसर्गिक तंतू-आधारित प्रणालीचा वापर शक्य झाला आहे. त्यामुळे त्याचे औद्योगिक उत्पादन आणि व्यापारीकरण सुलभ होईल असे संशोधक नितीन कुमार आर्य यांनी सांगितले.

नैसर्गिक तंतूंचा वापर केल्याने संमिश्र पदार्थांची मजबुती, टिकाऊपणा आणि पर्यावरणपूरकता वाढते. भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या रानटी गवतामध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी क्षमता आहे आणि ते पारंपरिक प्लास्टिकला शाश्वत पर्याय ठरू शकते.

प्रा. अपर्णा सिंग, आयआयटी मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news