

मुंबई : देशात आणि विशेषतः किनारपट्टी भागात वाढत्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती वारंवार उद्भवत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी पूराचा धोका आणि संभाव्य पाण्याची खोली यांचे अचूक अंदाज वर्तविणारी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली उपग्रहाकडून मिळणारा रडार डेटा आणि जमिनीच्या उंचीची माहिती वापरून पूरप्रवण क्षेत्रांची ओळख आणि पाण्याच्या पातळीचे पूर्वानुमान सांगणार आहे.
आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील संशोधक काशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्दो यांनी विकसित केलेली ही प्रणाली दक्षिण भारतातील पश्चिम घाटाच्या संवेदनशील किनारपट्टी पट्ट्यात ३० मीटर रिझोल्युशनवर पूरस्थितीचे नकाशे तयार करण्यास सक्षम आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यापासून कन्याकुमारीपर्यंतच्या सुमारे ५५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.
संशोधकांनी विकसित केलेल्या एआय मॉडेलने पूरप्रवण क्षेत्रे ९३ टक्क्यांहून अधिक अचूकतेने ओळखण्याची क्षमता दाखविली आहे. विशेष म्हणजे, केवळ पर्जन्यमानावर अवलंबून न राहता जमिनीवरून वाहणारे पाणी, मातीतील ओलावा, जमिनीचा वापर, पाणी शोषण्याची क्षमता आणि निचऱ्याची स्थिती अशा विविध घटकांचा एकत्रित विचार करून हे मॉडेल काम करते. त्यामुळे पूरस्थितीचा अधिक वास्तववादी अंदाज मिळू शकतो, अशी माहिती संशोधक काशिश साधवानी यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना पूरपूर्व नियोजन, संवेदनशील भागांना प्राधान्य, नागरिकांचे स्थलांतर आणि बचावकार्य अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करू शकते. स्थानिक प्रशासनाला मर्यादित संसाधनांचे योग्य नियोजन करता येईल आणि आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. सध्या ही प्रणाली मुख्यतः सात टक्क्यांपेक्षा कमी उतार असलेल्या भूभागांसाठी विकसित करण्यात आली असली, तरी भविष्यात मुंबईसारख्या गुंतागुंतीच्या शहरी भागांसाठी आणि इतर किनारपट्टी प्रदेशांसाठीही ती वापरण्याची क्षमता असल्याचा विश्वासही संशोधकांनी व्यक्त केला आहे.
हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि पूराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, आयआयटी मुंबईची ही एआय-आधारित प्रणाली केवळ पूराचा अंदाज वर्तविणारी तांत्रिक संकल्पना नसून आपत्ती व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
दोन टप्प्यांत काम करणारी प्रणाली
दोन स्वतंत्र मशीन लर्निंग मॉडेलचा वापर या प्रणालीत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एखादे क्षेत्र पूरप्रवण आहे की नाही, याचे वर्गीकरण केले जाते. दुसऱ्या टप्प्यात त्या भागात किती पाणी साचू शकते आणि त्याची खोली किती असेल, याचा अंदाज वर्तविला जातो. त्यामुळे प्रशासनाला कोणते रस्ते, शाळा, रुग्णालये किंवा वस्त्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, याचा आधीच अंदाज मिळू शकतो. यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीच्या सेंटिनेल-१ उपग्रहाच्या सिंथेटिक ॲपर्चर रडार (एसएआर) प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. हे रडार दाट ढग आणि पावसाळी परिस्थितीतही जमिनीवरील बदल अचूकपणे टिपले जातात.
आपत्ती व्यवस्थापनाला मदत कशी होणार
पूरपूर्व इशारा प्रणाली अधिक सक्षम करता येईल.
कोणते रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये आणि गावे धोक्यात येऊ शकतात, हे आधीच समजू शकणार
स्थलांतर आणि बचावकार्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार
एनडीआरएफ, एसडीआरएफ, आरोग्य पथके आणि मदत साहित्य कुठे पाठवायचे, याचा अचूक निर्णय
नागरी नियोजन, नदीकाठच्या बांधकामांना परवानगी आणि पूरप्रवण क्षेत्रांसाठीही ही प्रणाली उपयोगी