

MNS warning Multiplex Marathi Film Screens
मुंबई: मुंबईच्या चित्रपटगृहांमध्ये हिंदी आणि मराठी सिनेमा लावण्यावरून पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. यावेळी वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे यशराज फिल्म्सचा हिंदी सिनेमा 'सैयारा' आणि मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला 'येरे येरे पैसा ३'. 'येरे येरे पैसा ३' या मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी करून त्या 'सैयारा'ला देण्यात आल्याने मनसे आणि मल्टिप्लेक्स मालक पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
अमेय खोपकर निर्मित 'येरे येरे पैसा ३' हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच, अचानक काही मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचे शो कमी करण्यात आले. त्याऐवजी, यशराज फिल्म्सच्या 'सैयारा' या हिंदी सिनेमाला अधिक स्क्रीन्स देण्यात आल्या. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "येरे येरे पैसा ३ च्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण आहे. आम्ही पक्षातर्फे मल्टिप्लेक्स मालकांना इशारा देत आहे की, मराठी सिनेमाच्या स्क्रीन्स कमी करू नका, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने लावू."
देशपांडे पुढे म्हणाले की, आज आमची बैठक झाली, त्याबद्दल सविस्तर सांगता येणार नाही. पण हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या सिनेमावर अशी अन्यायकारक वागणूक दिली जात आहे, मल्टिप्लेक्स मालक हे जाणूनबुजून करत आहेत.
मराठीचे खरे मारेकरी वेगळेच; राऊतांचा इशारा
मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत. संयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले. हे नेहमीचेच झाले आहे,,मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे.