

मुंबई ः मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आगामी काळात ते एकत्रितरीत्या निवडणूक लढवतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज यांचे अत्यंत विश्वासू बाळा नांदगावकर यांनी वेगळाच सूर लावला आहे. आतापर्यंत आम्ही अनेक निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर एकट्याने निवडणुका लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, उबाठा आणि मनसे यांची युती होणार की नाही हे मला माहीत नाही. युती आणि आघाडीबद्दल राज ठाकरे बोलतील. आपापला पक्ष वाढविण्यासाठी सर्वजण काम करतात. पक्षाचे हित कशात आहे हे पक्षप्रमुखांनाच चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यामुळे तेच योग्य तो निर्णय घेतील. तूर्त मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील काय, याची मला कल्पना नाही. मात्र, ठाकरे यांची शिवसेना दिशाहीन झाली आहे. त्यांचा एक नेता सकाळी येऊन बरळतो आणि त्या आधारे पक्ष चालतो. माझ्या मते हा प्रकार कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.