

मुंबई : विद्यार्थिनींना व्हॉट्सॲपवर रोमँटिक मेसेज पाठवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शिक्षण सेवकाला उच्च न्यायालयाने दणका दिला. विद्यार्थ्याला शिक्षकाने आक्षेपार्ह संदेश पाठवणे हे शाळा व्यवस्थापनाला शिक्षकाच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यासाठी पुरेसे कारण ठरते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शाळा न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत शिक्षकाचे अपिल न्या. सोमशेखर सुंदरसेन यांच्या एकलपीठाने फेटाळले.
रायगड जिल्ह्यातील शाळेने शिक्षण सेवकाच्या सेवा समाप्तीची कारवाई केली. त्यावर आक्षेप घेत शिक्षण सेवकाने मुंबई येथील शाळा न्यायाधीकरणाच्या ऑगस्ट 2024 मधील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती सुंदरसेन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला. शिक्षकाने विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर रोमँटिक मेसेज पाठवणे हा मुद्दा गंभीर आहे.
याबाबत विद्यार्थ्यांचे पालक, रहिवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा परिस्थितीत शाळा व्यवस्थापनाने सेवा समाप्तीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे निरिक्षण न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी नोंदवले.
पाठवलेल्या मेसेजबाबत कबुली
याचिकाकर्त्याला 29 फेब्रुवारी 2020 रोजी तीन वर्षांसाठी शिकाऊ सहायक शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. डिसेंबर 2022 मध्ये शाळेला विद्यार्थिनींच्या व्हॉट्सॲपवर आलेल्या रोमँटिक मेसेजबद्दल पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याचिकाकर्त्या शिक्षकाने मुख्याध्यापकांकडे लेखी माफी मागितली होती. त्यात त्याने विद्यार्थ्यांना पाठवलेल्या मेसेजबाबत कबुली दिली होती.