पुढारी ऑनलाईन डेस्क
'असना' चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूरवर गेले असून ते ईशान्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर घोंघावत आहे. पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावरील वादळी प्रणाली (डिप्रेशन) आज मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टनमजवळ धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.
“मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे आहे. बंगालच्या उपसागरात एक वादळी प्रणाली निर्माण झाली आहे. ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा दरम्यान मध्यरात्री धडकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे मध्य आणि उत्तर द्वीपकल्पीय भारतात पुढील ३-४ दिवस मुसळधार पाऊस पडेल,” अशी माहिती हवामान विभागाच्या (IMD) शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी सांगितले.
यामुळे ३१ सप्टेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भाग आणि तेलंगणा तसेच १ सप्टेंबरला विदर्भात (Vidarbha) मुसळधार (Heavy to very heavy rainfall) ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी १ ते २ सप्टेंबर दरम्यान आणि विदर्भात ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला १ ते ४ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४ सप्टेंबरला यलो अलर्ट राहील. अकोला, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.