पुढारी ऑनलाईन डेस्क
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातील जिल्ह्यांच्या काही भागात आज (दि.९) आणि उद्या (दि.१०) मुसळधार पावसाची (Monsoon Update) शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (India Meteorological Department) म्हटले आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला आज शुक्रवारी (दि.९) जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, रायगडमध्ये उद्याही जोरदार पाऊस राहील. या जिल्ह्यांत पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल. आठवडाभरात मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छमधील काही भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून ट्रफ सक्रिय असून सध्या ते सरासरी समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील ३ ते ४ तासांत पुणे, रायगड, सातारा जिल्ह्याच्या घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.