

मुंबई : मंगळवारी रात्रभर बरसलेल्या मान्सूनच्या आनंदसरींनी सुखावलेला मुंबईकर बुधवारी सकाळी घराबाहेर पडला मात्र त्याला चौफेर कोंडीला सामोरे जावे लागले. पहाटेपर्यंतच २०० ते ३०० मिमीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे मुंबई नेहमीप्रमाणे पाण्यात गेली. त्यामुळे मुंबईकरांची लाइफलाईन (लोकल सेवा) कोलमडली तर रस्ते वाहतूकही कोंडीत अडकली. बेस्ट सेवाही अपुरी पडल्याने मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.
मान्सूनची मुंबईकर चातकाप्रमाणे वाट पहात होते. मंगळवारी सकाळीच मान्सून मुंबईत दाखल झाला. दिवसभर अधूनमधून बरसात केली. त्यामुळे मुंबईकर सुखावला होता. मात्र रात्रभर मुसळधार बरसला. पहाटेपर्यंत २०० ते ३०० मिमीपेक्षा जास्त बरसात केली. त्यामुळे जागोजागी पाणी तुंबल्याने बुधवारी पहाटेपासून घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.
सखल भागांत पाणी साचल्याने दादर प्लाझा, वाकोला सांताक्रूझ, अंधेरी आणि मालाड येथे प्रचंड वाहनकोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे बेस्ट सेवाही प्रभावीत झाली. तर मुंबईची लाईफलाईन लोकलसेवेवरीही त्याचा परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटाने उशिरा धावत होत्या. वडाळा स्थानकात गाड्या उशिरा येत असल्याने प्रवाशांची सकाळी रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी झाली होती.
पश्चिम रेल्वे मार्गावरही दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली येथे प्रवाशांची नियमित गाड्यांसाठी वाट पाहत उभे राहण्याची वेळ आली. गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोड द्यावेे लागले. काही प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून रिक्षा, बस आणि खासगी वाहनांचा आधार घेतला.