

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : मागील चार ते पाच दिवसांपासून पनवेल मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे 23 जुलैपर्यंत सरासरी 2100 मिलिमीटर पावसाची नोंद पनवेलमध्ये झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत पनवेलमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाऊस पडून गेलेला आहे.
जुलै महिना संपत आलेला आहे. गेल्या आठवड्यापासून पनवेलसह नवी मुंबई परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पाऊस उसंत घेण्याचे नाव घेत नाही. मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी लावणी सुरू आहेत. तर काहींची शेती लावून झाली आहे. पनवेल तालुक्यात दरवर्षी अंदाजे साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी 23 जुलैपर्यंत सरासरी 2100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. 18 जुलै ते 23 जुलै पर्यंत सहा दिवसांत पनवेलमध्ये तब्बल 550 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 1 जुलै ते 22 जुलै पर्यंत पंधराशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने हा पाऊस कधी थांबेल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
जुलै महिन्यात 13 जुलै रोजी सर्वाधिक 155 मिलिमीटर पाऊस पडला. पनवेलच्या ग्रामीण भागात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाची रिमझिम सुरू असल्याने पनवेल तालुक्यातील मोरबे धरण आणि गाढेश्वर धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. गाढी नदीला पूर आला आहे. पाण्याचा प्रवाह सुरू आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने पर्यटकांची चंगळ सुरू आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातील नद्या, नाले, धबधबे, फार्म हाऊसवर गर्दी होत आहे. अंदाजे सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे अद्याप दोन महिने पावसाचे शिल्लक आहेत. या दोन महिन्यात देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळे यावर्षी पनवेल मध्ये विक्रमी पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.