कुर्ला, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या सखल वस्तीत मोठ्या प्रमाणत पाणी साचले. त्यामुळे रहिवाश्यांची तारांबळ उडाली. चेंबूर येथील पोस्टल कॉलनी परिसरात तीन ते चार फूट पाणी भरले होते. हे पाणी इथल्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे रहिवासी घरे सोडून निघून जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. (heavy rain in mumbai)
परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. बाजूलाच असलेल्या पालिकेच्या रुग्णालय परिसरात ही मोठ्या प्रमाणत पाणी भरल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पोस्टल कॉलनी या परिसरात सरकारी अधिकारी, व्यवसायिक, उद्योजक मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र दरवर्षी या ठिकाणी रस्त्यांवर नदी सारखी स्थिती असते. इथल्या घरांमध्ये पाणी भरल्याने रहिवाश्यांची मोठी तारांबळ उडते. मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. सखल भागात असणा-या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्य भिजले. रात्रीच्या निवाऱ्याची ही व्यवस्था इथल्या इमारती मधील रहिवाश्यांना इतरत्र करावी लागली आहे. इथे पालिकेने एक पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा तुटपुंजा प्रयत्न केला, मात्र याचा काहीच परिणाम न झाल्याने अनेक तास पोस्टल कॉलनी परिसर जलमय झाला होता. (heavy rain in mumbai)