

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईत पावसाचा जोर कायम असून उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. परळ नाका, हिंदमाता, सायन गांधी मार्केट व ठीक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वालजी लड्डा मार्ग मुलुंड येथे झाड पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. तर मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या लेटमार्कमुळे आज (रविवार) कुटुंबासह पावसाची मजा घेण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले.
मुंबई शहर व उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे हे पाणी एस. व्ही. रोडपर्यंत आले होते. त्यामुळे सबवेतील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. तुंबलेल्या पाण्याचा पंप सुरू करून निचरा करण्यात आला. मालाड, मानखुर्द, दहिसर, खार व पोयसर सबवेमध्येही पाणी तुंबले होते. मात्र येथील वाहतूक सुरूच होती. तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सतत पंप चालू ठेवण्यात आले होते. कुर्ला भागात पाणी साचल्याने येथील वाहतूक एलबीएस रोड कुर्ला, डब्ल्यूईएच, कला नगर धारावी टी जंक्शन, सायन मार्गाकडे वळवण्यात आली.
प्रभादेवी वरळी परिसरातही पाणी तुंबल्यामुळे येथील वाहतूक मुरुडकर मार्ग प्रभादेवी संत रोहिदास मार्ग आणि सेनापती बापट मार्गे वळवली. तर चेंबूरमध्ये पाणी तुंबल्याने येथील वाहतूक शेल कॉलनी चेंबूर नाका मार्गे वळवली. अचानक वाहतुकीमध्ये बदल झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
मानखुर्द - ६९ मिमी
शिवाजीनगर - ५६ मिमी
वडाळा - ५४ मिमी
शिवडी - ५२ मिमी
चेंबूर - ४८ मिमी
वरळी नाका - ४५ मिमी
प्रभादेवी - ४३ मिमी