

मुंबई ः ज्येष्ठ भावगीत गायक, संगीतकार गोविंद पोवळे यांचे रविवारी अंधेरी येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सुयोग आणि सूरदास ही दोन मुले, तीन मुली, सुना,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरीच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंद पोवळे यांचे वास्तव्य जन्मापासून पनवेल जवळील चिरनेर येथे होते. त्यांचे शालेय शिक्षणसुद्धा पनवेलमध्ये झाले. त्यांचे वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार. मोठे बंधू गोपीनाथ, दीनानाथ पोवळे गायक, तर रामनाथ पोवळे संवादिनी वादक होते. या वारशामुळे लहानपणापासून आपल्याला गायक व्हायचे आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण नगरकर आणि दत्तोबा तावडे यांच्याकडे घेतले. थोरले बंधू गोपीनाथ पोवळे हे आकाशवाणीसाठी गात असत.
ते कार्यक्रमदेखील करत. त्यांच्या कार्यक्रमात मध्यान्तरात गोविंद पोवळे यांना गाणे सादर करण्याची संधी मिळत असे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण नगरकर आणि दत्तोबा तावडे यांच्याकडे घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबईत आकाशवाणीवर ऑडिशन दिली होती. 30 मार्च 1948 रोजी त्यांचा आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम झाला. तेव्हापासून सर्वात लहान कलाकार म्हणून ते प्रसिद्ध झाले.
एच. एम. व्ही. च्या वसंतराव कामेरकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ‘उमटली रामाची पाऊले’ या गीताला संगीत दिले. काम-धाम संसार विसरली, राधिका हरी भजनी रंगली, पैंजण हरीची वाजली... गाई - गुरं हंबरली.. रात्र काळी, घागर काळी, अशा अनेक गीतांना त्यांनी संगीताचा साज चढवला त्यांच्या संगीत दिग्दर्शनात ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर आणि दिवंगत गायिका माणिक वर्मा यांनी गाणी गायली आहेत. माती सांगे कुंभारला... पायी मज तुडवसी.... तुझा आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी... काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती आणि रात्र काळी घागर काळी या गीतांनी त्यांना लोकप्रियता मिळाली.
भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या आवाजाशी साधर्म्य असल्याने व्हॉईस ऑफ गजानन वाटवे अशी त्यांची ओळखही झाली होती. मात्र पोवळे यांनी अभ्यासाअंती आपली स्वतंत्र शैली विकसित केली होती.