

मुंबई : तिन्ही पाळ्यांमध्ये रुग्णसेवा देताना शासकीय परिचारिकांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले आहे. परिचारिकांच्या कुटुंबामध्ये सासू सासरे आणि नवरा सुद्धा अवलंबून राहत असल्याने बदलीमुळे वाद वाढले आहेत.
बदल्यांच्या मतभेदांमुळे शेकडो परिचारिकांचे घटस्फोट झाले असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण कदम यांनी येथे केला. बदलीमुळे घटस्फोटीत,रस्ते अपघात आणि कुटुंबात विस्कोट झालेल्या परिचारिकांची आकडेवारी सरकारला सादर करणार असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण कदम, राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, उपाध्यक्ष भिमराव चक्रे, हेमलता गजबे आदी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधत साधला. परिचारिकांना प्रशासकीय बदली धोरणातून वगळून केवळ विनंती व तक्रार आधारित बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनेने यावेळी केली. यासाठी संघटनेने आझाद मैदानात 18, 19 आणि 20 मे पर्यंत धरणे आंदोलन केले.
कार्याध्यक्ष अरुण कदम पुढे असेही म्हणाले, रुग्णसेवेत 90 टक्के महिला परिचारिका आहेत. बदलीमुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात संघर्ष निर्माण झाला आहे. एकाच जिल्ह्यात नोकरीची स्थिरता नसल्याने घरात मतभेद वाढत आहेत. त्यातून शेकडो महिलांचे घटस्फोट झाले आहेत. त्याची आकडेवारी आम्ही संकलित करीत आहोत. संघटनेकडून घटस्फोटीत महिलांसाठी काम सुरू आहे. लवकरच घटस्फोटीत,रस्ते अपघात आणि कुटुंबात विस्कोट झालेल्या परिचारिकांची आकडेवारी सरकारला देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
काम बंद आंदोलनाचा इशारा
दरम्यान, राज्यभरातील परिचारिकांनी काम बंद न करता आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झालेला नाही. मात्र बदलीमुळे परिचारिकांचे घटस्फोट, रस्ते अपघात आणि कुटुंब विस्कोट होत असल्याचा आरोपही राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी यावेळी केला. सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला.