

मुंबई: बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन या संघटनेने २८ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पुकारलेला संप इंडियन बँक्स असोसिएशनशी रविवारी रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर स्थगित केला. त्यामुळे सोमवारपासून (दि. २८) सुरू होणाऱ्या प्रस्तावित संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता तूर्तास टळली आहे.
उर्वरित शनिवार सुट्टीचे दिवस घोषित करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी आयबीए आणि यूएफबीयू यांची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्याचे बैठकीत ठरले आहे. ही समिती विविध पर्यायांचा विचार करून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करून या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यूएफबीयूने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, स्केल ४ आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठीच्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेत बदल करण्याबाबतही आयबीए आणि संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. ८ मार्च २०२४ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांवरही लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे निश्चित झाले.
या पार्श्वभूमीवर यूएफबीयूने प्रस्तावित आंदोलन आणि संपाचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यास सहमती दर्शवली.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. या पत्रात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए), अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ यांच्या सह्या आहेत.