मुंबई : गोवंडी शताब्दी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय खासगी भागीदारीतून चालवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने हे हॉस्पिटल चालवण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. तसा पत्रव्यवहारही मुंबई महापालिकेशी करण्यात आला असून महापालिका प्रशासनही राजी झाले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलचा ताबा लवकरच तेरणा ट्रस्टकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेने बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलसह घाटकोपरचे राजावाडी व गोवंडी शताब्दी हॉस्पिटल खासगी भागीदारीतून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. परंतु हॉस्पिटल चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ व पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ही तिन्ही हॉस्पिटल सामाजिक संस्थांच्या हातात सोपवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी गोवंडी शताब्दी हॉस्पिटल खासगी भागीदारीतून चालवण्यासाठी तेरणा ट्रस्टसह तेलंगणाच्या सुरभी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी उत्सुकता दर्शवली आहे. तेरणा ट्रस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सावत्र भाऊ पद्मसिंह पाटील यांची आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त पवार यांचे पुतणे व तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत.
चेंबूर, गोवंडी, बैंगनवाडी मानखुर्द, शिवाजी नगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी गोवंडीचे शताब्दी हॉस्पिटल मोठा आधार आहे. 210 खाटांचे हे हॉस्पिटल आता 580 खाटांचे झाले आहे. सुरूवातीला सुमारे 882 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु आर्थिकदृष्ट्या ते शक्य नसल्यामुळे खाटांची संख्या कमी करण्यात आली. हे हॉस्पिटल खासगी भागीदारीतून चालवताना 264 खाटा सामान्य रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना येथे उपचार घेता येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
तेरणाने उत्सुकता दाखवल्यामुळे पालिका सकारात्मक
शताब्दी हॉस्पिटल खासगी भागीदारीतून चालवण्यासाठी सर्व पात्र संस्था भाग घेऊ शकत होते. या हॉस्पिटलचा ताबा देताना, पालिकेचे सर्व नियम सर्व संस्थांना पाळावे लागणार आहेत. तेरणा ट्रस्टलाही हे नियम पाळावे लागतील. हा ट्रस्ट नवी मुंबईत एक वैद्यकीय महाविद्यालय चालवतो. पालिकेच्या आरोग्य विभागाने शताब्दी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी खासगी भागीदार शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु फारशी उत्सुकता दाखवण्यात आली नाही. त्यामुळे तेरणा ट्रस्टशी लवकरच करार करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.