

Gopichand Padalkar Supporter Who Is Rushikesh Takle
मुंबई : गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या मारहाणीचा राज्यात सर्वच स्तरातून निषेध होत आहे. दुसरीकडे आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पडळकर समर्थकाचा फोटो आता समोर आला आहे. गुरुवारी विधिमंडळात पडळकर यांच्यासोबत प्रवेश करतानाचा फोटो समोर आला असून पडळकरांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कार्यकर्त्यासोबतचा फोटोही माझाही आहे, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, या घटनेबाबत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आव्हाड आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये बुधवारी बाचाबाची झाली होती. त्यात आव्हाडांची चूक काहीच नव्हती. गुरुवारी याच घटनेचा बदला घेण्यासाठी पडळकर चार ते पाच गुंड घेऊन आले होते. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचा विधिमंडळात प्रवेश करतानाचा फोटो देखील आहे, अशा लोकांना प्रवेश कोणी दिला, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.
'मी दिसलो नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्याला मारलं'
मला आता या वादावर अधिक भाष्य करायचे नाही. 'मकोका' लागलेले आरोपी इथे येतात यापेक्षा दुर्दैवी काय आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. विधान सभेतील भाषणानंतर मी बाहेर गेलो होतो. मी दिसलो नाही म्हणून त्या लोकांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुखला मारहाण केली, असा आरोप आव्हाड यांनी केला. नितीनला मारहाण झाली हे जेव्हा समजलं तेव्हा मी तातडीने परत आलो. मी व्हिडिओ बघितले, त्यावरून सरळ दिसतंय की ते मारहाणीच्या उद्देशानेच आलेच होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याचे नाव ऋषिकेश टकले असे असल्याचे समजते. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला आहे. विश्वजित कदमांनीही लॉबीत झालेल्या भेटीदरम्यान टकलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले, असंही आव्हाड म्हणाले.
विधानभवनात बुधवारी काय घडलं होतं?
गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. बुधवारी विधिमंडळाबाहेर जितेंद्र आव्हाड हे संतोष देशमुख यांचे बंधू गणेश देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर कारमधून तिथे आले. पडळकरांनी कार थांबवून अचानक दरवाजा उघडला. कारच्या दरवाजाचा धक्का लागल्याने आव्हाड संतापले. त्यांनी पडळकरांना जाब विचारला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली. पडळकर शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता.
गुरुवारी काय घडले?
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत आमनेसामने आले. पडळकर यांच्या कार्यकर्त्याने आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. कपडे फाटेपर्यंत मारहाण आणि शिवीगाळीची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली. विधान भवन हे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असते आणि तिथेच कार्यकर्ते असे फ्रि स्टाईल मारामारी करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.