

मुंबई : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दादरचा कबुतरखाना बंद झाल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन केले. यावेळी मुंबईतील प्रत्येक वॉर्डात कबुतरखाना उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता गिरगावातील आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
‘आम्ही गिरगावकर’चे गौरव सागवेकर यांनी निवडणुका आल्यामुळे प्रत्येक वॉर्डात कबुतरखाने उभे केले जाणार असल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही कबुतरखाने उभारले जात आहेत. त्यांना मैदाने दिली जात आहेत. स्वातंत्र्यवीरांची नावे पुसून रस्त्यांना त्यांच्या समाजातील नागरिकांची नावे दिली जात आहेत, असाही आरोप सागवेकर यांनी केला आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार, टीबीसारखे रोग होऊ शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. तरीही प्रत्येक वॉर्डात आम्ही कबुतरखाने उघडू, असे सांगितले जात आहे. जेथे कबुतरखान्याना परवानगी दिली जाते त्याच्या बाजूलाच चिकन-मटण सेंटरला परवानगी देण्याची मागणी आम्ही महापालिकेकडे केली आहे. परंतु संबंधित अधिकारी आम्हाला भेटायला तयार नसल्याचे गौरव सागवेकर यांनी म्हटले आहे.