मुंबई : गिरगांव चौपाटीवरील लोकमान्य टिळक उद्यानात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून सुरू करण्यात आलेल्या ग्लो गार्डनचा ‘ग्लो’ वर्षभरातच हरपल्यामुळे उद्यानात मुला-बाळांना घेऊन येणार्या नागरिकांचा पुरता हिरमोड झाला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून ग्लो गार्डनमध्ये लावलेल्या शोभेच्या प्रतिमांमधील दिवे बंद पडल्यामुळे लोकमान्य टिळक उद्यानात आता अंधार पसरला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी लोकमान्य टिळक उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. याविषयी अनेकांनी तक्रार करून देखील पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक उद्यानात मुंबई महापालिकेकडून पशुपक्षी आणि प्राण्यांच्या प्लास्टिक, फायबरच्या शोभेच्या प्रतिमा बसवण्यात आल्या होत्या. या प्रतिमांमध्ये मंद दिवे लावण्यात आले होते. मंद दिव्यांच्या प्रकाशामुळे उद्यानाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. झाडांवर देखील दिव्यांची रंगीबेरंगी तोरणे सोडण्यात आली होती. त्याचबरोबर इलेक्ट्रिक झाडे देखील उभारण्यात आली होती. झाडांवर पशुपक्ष्यांच्या विविध घरट्यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. लोकमान्य टिळक उद्यानातील या ग्लो गार्डनचे अनावरण मंत्री महोदयांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या या अनोख्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले होते. परंतु त्यानंतर काही महिन्यांतच झाडांवरील आणि प्राण्यांच्या प्रतिमांमधील दिवे बंद पडल्यामुळे या उद्यानात संध्याकाळच्या वेळी अंधार पसरत पडत आहे. परिणामी, नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
‘लाईट शो’ फसल्यामुळे झाली होती चर्चा
लोकमान्य टिळक उद्यानात खास लाईट शो सुरू करण्यात येणार होता. त्या माध्यमातून महापुरुषांवर आधारित चित्रफित दाखवण्यात येणार होत्या. या लाईट शोचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात येणार होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा रिमोटची कळ दाबल्यानंतर सुद्धा लाईट शो सुरू होत नव्हता. त्यामुळे कंत्राटदारावर लोढा आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी चांगल्याच भडकल्या होत्या. ‘लाईट शो आज सुरू झाला नाही, तर पुढचे बिल मिळणार नाही,’ अशी धमकीच कंत्राटदाराला देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते.