कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी हिंदू स्मशानभूमीतील चितेची दयनीय अवस्था झाली असून सार्वजनिक सोयीसुविधांअभावी कांदिवली पश्चिम ते चारकोप, महावीरनगर, डहाणूकरवाडी परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पालिकेने चितेची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
कांदिवली पश्चिमेला प्रचंड लोकवस्ती आहे. या विभागातील नागरिकांसाठी डहाणूकरवाडी ही एकमेव स्मशान भूमी आहे. या स्मशान अंत्यसंस्कारासाठी सहा चिता व दोन विद्युत दाहिनींची व्यवस्था आहे. या ठिकाणी दिवसातून 15 ते 20 अंत्यसंस्कार केले जातात. सध्या चितेच्या खालील भिंतीचे कोपरे ढासळले आहेत. चितेमधील काही बीडच्या जाळ्या खचल्या आहेत तर काही तुटल्या आहेत. तसेच चितेखालील जमिनीला खड्डे पडले आहेत. यामुळे अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख व अस्थी काढताना कर्मचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच वृक्षाभोवती असलेले चौथारे तुटलेले आहत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी वाहत आहे. यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकूणच डहाणूकरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. अंत्यसंस्कार, सावडणे आणि इतर धार्मिक विधी करताना स्मशान भूमीत येणार्या शेकडो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेने सदर कामाची तातडीने डागडुजी करावी, अशी विनंती पालिकेला केली आहे.