Navi Mumbai water shortage : घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा ‘हंडा मोर्चा’

आंघोळ, दात घासत केला अनोखा निषेध
Navi Mumbai water shortage
नवी मुंबई : पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी घणसोलीतील नागरिकांनी हंडा मोर्चा काढला.pudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून घणसोली परिसरातील नागरिकांना अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असून तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी घणसोली विभागीय कार्यालयावर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढत जोरदार आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान काही नागरिकांनी चक्क रस्त्यावर आंघोळ करत तसेच हातात टूथब्रश घेऊन दात घासत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

घणसोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही नागरिकांची मोठी कसरत सुरू आहे. या परिस्थितीची दखल घेत नगरसेवक सौरभ शिंदे यांनी नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. मात्र, टँकरचे पाणी किती दिवस पुरणार? पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? असा सवाल उपस्थित करत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Navi Mumbai water shortage
Maharashtra SIR voter list : मुंबईतील २१ लाख २४ हजार मतदारांत विसंगती

या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने डोक्यावर हंडे घेऊन घणसोळी विभागीय कार्यालयावर धडकले. ‘पाणी द्या, पाणी द्या’, ‘नागरिकांना वेठीस धरणे बंद करा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घणसोळी विभागीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास त्वरित थांबवावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Navi Mumbai water shortage
JJ Hospital Staff Shortage : ‘जेजे’तील १९ साहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द

नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, पाणीप्रश्न तातडीने सोडवला नाही, तर भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक शिंदे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धती तसेच पाणीप्रश्नात होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संतप्त शब्दांत सांगितले की, जे काही राजकारण करायचे असेल ते आमच्यासोबत करा; मात्र गरीब जनतेला वेठीस धरू नका. नागरिकांचा पाणीप्रश्न सुटत असेल, तर गरज पडल्यास मी राजीनामा देण्यासही तयार आहे, असे स्पष्ट केले.

अनोखे आंदोलन

या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे नागरिकांनी केलेला अनोखा निषेध. पाणीटंचाईमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही नागरिकांनी आंदोलनस्थळीच आंघोळ केली, तर काहींनी हातात टूथब्रश घेऊन दात घासत निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनाची घणसोळी परिसरात दिवसभर जोरदार चर्चा रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news