

राज्यात यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळासह मध्य रेल्वे देखील सज्ज झाली आहे. मुंबईतील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी मध्यवर्ती रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यंदा रेल्वेच्या 300 पेक्षा जास्त फेऱ्या वाढण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेने या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारेदिली आहे.
कोकणात गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या साखर महिन्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर 300 पेक्षा जास्त गणपती स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी, बांद्रा ,एलटीडी,दिवा, दादर, या स्थानकावरून कोकणासाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मध्य व पश्चिम रेल्वेकडून या जादाच्या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी बस ऑनलाईन आरक्षणासाठी www.npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.