

एक लाखांहून अधिक घरगुती,
7 सार्वजनिक गणपती विसर्जन
कृत्रिम कुंड, भाट्ये, मांडवी किनारी झाले विसर्जन
महिला, तरुणी, चिमुकल्यांच्या डोळ्यातून अश्रू
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, जंगी मिरवणूक काढून, गुलाब पुष्पांची उधळण करीत जड अंत:करणाने डोळ्यात अश्रू आणून लाडक्या गणरायास मंगळवारी शहरातील भाट्ये, मांडवीसह ग्रामीण भागातील नद्या, कृत्रिम कुंडात गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील एक लाखहून अधिक घरगुती, तर 7 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात गणेशभक्तांची सर्वत्र गर्दीच गर्दी झाल्याचे दिसून आले.
रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीनिमित्त लाडक्या बाप्पांचे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून सार्वजनिक, घरोघरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी आल्यामुळे जिल्हा गजबजला होता. गणेशोत्सवामुळे सर्व कुटुंबे एकत्रित येत भक्तिभावाने लाडक्या बाप्पांची पूजा केली. घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्यात आले होते. दीड दिवसाच्या तब्बल 13 हजार 844 घरगुती तर 7 सार्वजनिक गणरायांना भक्तिभावात निरोप दिला.
त्यानंतर मंगळवारी गौरी विसर्जनाच्या दिवशी घरगुती,सार्वजनिक गणपती, गौराईचे विर्सजनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी होती. रत्नागिरी शहरातील भाट्ये बीच, मांडवी समुद्र किनार्यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजल्यापासून विसर्जनास सुरूवात झाली. कोणी कारमध्ये, कोणी रिक्षामध्ये, कोणी बग्गीमध्ये, तर कोणी मोठ्या आयशर गाडीत बाप्पाला सजवून मांडवी, भाट्ये समुद्रकिनारी आणण्यात आले. त्यानंतर बाप्पाची आरती करून लाडक्या बाप्पाला निरोप देताना कित्येक कोकणवासी भावूक झाले होते.
डोळ्यातून आश्रू येत होते. रात्री उशिरापर्यंत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी समुद्र किनार्यावर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. सर्वच समुद्र किनारे, कृत्रिम तलावासह विविध ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा दिसून आला. ठिकठिकाणी वाहतुकीसाठी वाहतूक पोलिस उपस्थित होते.