मुंबई : मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जन आता नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये करता येणार आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्त्रोतातील विसर्जनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.
गणेश दीड दिवसांच्या विसर्जनावेळी महापालिकेने सर्व मूर्तीचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, असा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पालिकेने शाडूच्या मूर्तीसह सहा फुटांखालील सर्वच मूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करण्यावर निर्बंध आणले होते. या निर्णयामुळे अनेक गणेशभक्त तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये नाराजी होती. समन्वय समितीने या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी सातत्याने संवाद साधला. अखेर समितीच्या मागणीकडे लक्ष वेधत मंडळाने सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील हजारो गणेशभक्तांसाठी दिलासा ठरलेला हा निर्णय गणेशोत्सवाच्या उत्साहात अधिक भर घालणारा ठरणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.
या निर्णयामुळे गिरगावातील ऐतिहासिक व मानाच्या गणेशमंडळांचा प्रश्न सुटला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परंपरेचा वारसा असलेले गिरगावातील केशवाजी नाईक चाळ गणेशोत्सव, शास्त्री हॉल मंडळ, नवरोजी वकील स्ट्रीट गणेशोत्सव यांसारख्या मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला यंदा कृत्रिम तलावात जावे लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीमुळे या ऐतिहासिक परंपरांना नैसर्गिक जलस्त्रोतामध्येच विसर्जनाची संधी मिळणार आहे.