

Online Admission Issues
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाने यंदाच्या नव्या प्रवेशात नांगी टाकली असून आता विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी आणि पासवर्डचे संदेश न येणे, अन्य कोणी लॉग-इन केले आहे, असा संदेश येणे, अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे, अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत गुरुवारच्या दिवशी नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असल्याने राज्यभरात प्रवेशाचा गोंधळ कायम आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात सर्वत्र यंदा प्रवेश सुरु केले आहेत. पहिल्या दिवसापासूनच या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी आवश्यक लॉग-इन आयडी आणि पासवर्ड न मिळणे, लॉग-इन अन्यत्र सुरू असल्याचा संदेश येणे, या अडचणींचा सामना करावा करावा लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रोजी 2 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. दुसर्या दिवशी यात घसरण झाली आणि दोन लाख 7 हजार 612 एवढ्याच विद्यार्थ्यांना अर्जनोंदणीत यश आले.
तिसर्या दिवशी ही संख्या प्रचंड खालावली आणि एक लाख 44 हजार 057 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवले. चौथ्या दिवशी यात काहीशी सुधारणा होत 1 लाख 51 हजार 733 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत 7 लाख 62 हजार 289 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली, तरी त्यापैकी 5 लाख 81 हजार 776 विद्यार्थ्यांचे नोंदणी शुल्क जमा झाले, तर पाच लाख 35 हजार 907 जणांनी आपले अर्ज अंतिम करून लॉक केले.
विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने अनेक पालक व विद्यार्थी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात धाव घेत असल्याने येथील तक्रार निवारण कक्षात दिवसाला 40 ते 50 तक्रारी घेऊन पालक येत आहेत. यंदा ही प्रवेश प्रक्रिया केंद्रिभूत असल्याने विभागीय उपसंचालकांकडे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे या तक्रार निवारण कक्षातील कर्मचारी हतबल असल्याचे चित्र दिसत आहे.