

Maharashtra Politics
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अपूर्व हिरे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर भाजपमध्ये आज पहिलाच हिरे यांनी पक्षप्रवेश केला.
नुकतेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी थेट दुरध्वनीकरून डॉ.अपूर्व हिरे यांना पक्षात अधिकृत प्रवेशासाठी आमंत्रित केलेले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा देखील झाली होती. त्यांनतर पक्षात अधिकृत प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमंत्रण व ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी सांगितले. पक्ष प्रवेशावेळी नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातून तसेच नाशिक शहरातून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवारी तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून ओळख असलेल्या घराण्यातील धुळ्यातील माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाटील यांचे स्वागत केले.