

नवी मुंबई : दरवर्षी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये साधारणपणे ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होत असते. त्यांचा अधिवास साधारणत: 3 ते 4 महिन्यांचा असतो. मात्र यंदा नोव्हेंबरमध्ये देखील अवकाळी पाऊस सुरू होता. त्यामुळे नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोचे आगमन होण्यास उशीरा सुरुवात झाली. फ्लेमिंगो पक्षी मोठया प्रमाणात न आल्यामुळे कांदळवन कक्षाकडून बोटिंग सफारी अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटक फ्लेमिंगो बोट सफारीच्या प्रतीक्षेत आहेत.
फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी हे इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून भारतातील विविध पाणथळ क्षेत्रांत हिवाळ्यादरम्यान येत असतात. गुजरातच्या कच्छमधून हजारो किमीचा प्रवास करून हे परदेशी पक्षी समुद्रकिनारी किंवा पाणथळ भागात येत असतात. नोव्हेंबर ते जास्तीत जास्त जून महिन्यापर्यंत ते येथे वास्तव्यासअसतात. त्यांचा मुक्काम कच्छव्यतिरिक्त माहूल-शिवडी, नवी मुंबईत असतो. ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच फ्लेमिंगो आगमनाची सुरुवात होते. मात्र यंदा नोव्हेंबरपर्यंत मान्सून लांबला होता.
नवी मुंबई शहरात म्हणावी तशी थंडीची चाहूल लागली नाही, त्यामुळे पक्षीप्रेमी फ्लेमिंगो अधिवासाच्या प्रतीक्षेत आहेत. नवी मुंबई शहरात नेरूळ, उरण तसेच ऐरोली-ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोचे दर्शन होत असते. फ्लेमिंगोच्या आगमनाची चाहूल लागताच पर्यटक, पक्षीप्रेमी फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत असतात. ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात या परदेशी पाहुण्यांना जवळून पाहता यावे याकरिता बोटिंग सफारी सुरू असते. मात्र अद्याप येथे मोठया प्रमाणात परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले नसल्याने ही बोटिंग सफारी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटक बोटिंग सफारीच्या प्रतीक्षेत आहे. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांना बोटिग सफारी मिळाली नाही. पण आता नाताळच्या सुट्टीत तरी बोटिग सफारी सुरु होईल का यांचे वेध पक्षीप्रेमी तसेच पर्यटकांना लागले आहे.