

मुंबई : मुंबईतील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आणखी पाच नवीन स्वयंचलित वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटीएम मिळून 28 केंद्रे कार्यरत आहेत. यात नव्याने 5 केंद्रांची भर पडल्याने ही संख्या 33 वर पोहोचणार आहे.
दादर, खार, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंड येथे ही केंद्रे उभारली जाणार असून अधिकाधिक भागांतील हवा गुणवत्ता मोजणे आता शक्य होणार आहे. यामुळे प्रदूषणाचा स्तर लक्षात घेऊन योग्य आणि तातडीच्या उपाययोजना करणे सोयीचे होईल, असे पर्यावरण विभागातील प्रशासनाने सांगितले. पालिकेच्या पर्यावरण विभागांतर्गत वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत विविध ठिकाणचे प्रदूषण मोजले जाते. तसेच कचराभूमी व महत्त्वाच्या वाहतूक नाक्यांवरील हवेची तपासणी स्वयंचलित वाहनांद्वारे केली जाते. ही सर्व केंद्रे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाशी जोडलेली असल्याने प्रदूषणाची रिअल-टाईम माहिती नागरिकांपर्यंत पोहोचते. मुंबईच्या लोकसंख्येनुसार साधारण 40 हवेची गुणवत्ता केंद्रे असणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत एमपीसीबीची 14, आयआयटीएमची 9 आणि पालिकेची 5 केंद्रे कार्यान्वित आहेत. आता नव्या केंद्रांमुळे या सुविधेचा अधिक विस्तार होणार आहे.
पालिकेची नव्याने होणारी 5 केंद्रे
गोरेगाव (पूर्व) आरे गार्डन, छोटा काश्मीर
मुलुंड (पूर्व) सी. डी. देशमुख उद्यान
दहिसर (पूर्व) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
दादर (पश्चिम) प्रमोद महाजन पार्क
खार (पश्चिम) पालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय