स्टँडअप शोमध्ये राडा घालणाऱ्या शिंदे सेनेच्या १९ समर्थकांविरोधात गुन्हा दाखल!
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील 'हॅबिटॅट' स्टँडअप कॉमेडी शोमध्ये तोडफोड आणि गोंधळ घालणाऱ्या शिवसेना युवासेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कानल आणि इतर १९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार नोंदवण्यात आला आहे. या घटनेची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्याच्या सोशल मिडीया हँडलवर ट्वीट करत दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला. कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका समाजमाध्यमावर पसरल्याने शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. राहुल कनाल आणि कुणाली सरमळकर यांनी पदाधिकार्यांसोबत जात कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामराच्याविरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
शिंदेच्या समर्थकांनी स्टूडिओ फोडला!
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबईतील या कॉमेडी शोदरम्यान काही युवकांनी प्रेक्षागृहात गोंधळ घालत स्टेजवरील साहित्याची तोडफोड केली. शोमध्ये वापरण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह मजकुरावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, लवकरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. तसेच, कोणत्याही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

