

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला.
कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका समाजमाध्यमावर पसरल्याने शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. राहुल कनाल आणि कुणाली सरमळकर यांनी पदाधिकार्यांसोबत जात कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामराच्याविरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. कुणाल कामराने शिंदेंची माफी मागावी अन्यथा त्याला फिरू दिले जाणार नाही, असा इशारा खा. नरेश म्हस्के यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणी अशा पद्धतीने टीका करत असेल तर ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी आम्हाला करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा हा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आखों पे चष्मा हाय... हाय...’ असे या कॉमेडी गाण्याचे बोल आहेत. त्याच्या या शो चा व्हिडिओ बाहेर येताच नवा वाद सुरू झाला आहे. कामरा याने शिंदे यांची माफी मागावी अन्यथा त्याचे तोंड काळे करू, असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.