

मुंबई : भारतीय शेअर निर्देशांक सप्टेंबर २०२४मध्ये उच्चांकी पातळीवर होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२४पासून जूनअखेरीपर्यंत विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) निव्वळ ६० अब्ज डॉलर्स शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. अगदी जून २०२६मध्येही ५.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. स्थानिक गुंतवणूक संस्थांनी (डीआयआय) १६२ अब्ज डॉलर्स मूल्याचा रुपया शेअर बाजारात गुंतविल्याने पडझड रोखली गेली.
सप्टेंबर २०२४मध्ये सेन्सेक्स उच्चांकी ८५ हजार आणि निफ्टी निर्देशांक २६ हजार अंकांवर गेला होता. त्यानंतरच्या महिन्यातच विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली नियुक्ती, त्यानंतर जगभरातील शेअर बाजारात उमटलेल्या प्रतिक्रिया, ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेली स्थिती, भारत-पाकिस्तान संघर्ष आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२६च्या अखेरीस अमेरिका आणि इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाचे भाव १२० डॉलर प्रतिबॅरलवर गेले.
या कालावधीत विदेशी संस्था निव्वळ शेअर विक्रेत्या झाल्या. यादरम्यान काही क्षेत्रांत विदेशी संस्थांनी गुंतवणूक केली असली, तरी विक्रीच्या मानाने गुंतवणूक तोकडी राहिली आहे. मार्च (२०२६) महिन्यात विदेशी संस्था विक्रमी १२.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली. केवळ फेब्रुवारी महिन्यात विदेशी संस्थांनी अडीच अब्ज डॉलर्सची निव्वळ गुंतवणूक केली. मात्र, जानेवारीपासून विदेशी संस्थांनी २९.२ अब्ज डॉलर्स शेअर बाजारातून काढून घेतले आहेत.
जून महिन्यात ऑईल अँड गॅस निर्देशांकातून १.४ अब्ज डॉलर्स विदेशी संस्थांनी काढून घेतले. खालोखाल ऑटोमोबाईल १.१, मेटल एक, टेक्नोलॉजी ८० कोटी डॉलर्स काढून घेतल्याची माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालात देण्यात आली आहे.
विदेशी संस्थांनी येथून काढली गुंतवणूक...
विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांमधून सर्वाधिक ११.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली असून, टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्यांमधून ३.७ आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमधून ३.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. याशिवाय एफएमसीजी आणि टेलिकॉम कंपन्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढली आहे.
शेअरबाजारातून २० महिन्यांत ६० अब्ज डॉलर्स गुंतवणूक विदेशात
स्थानिक गुंतवणूक संस्थांनी १६२ अब्ज डॉलर्स शेअरमध्ये गुंतविले