

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) आयटीसह जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये कायम असल्याने शुक्रवारी (दि. 13) सलग दुसर्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्स 1 हजार 48 आणि निफ्टी निर्देशांक 336 अंकांनी कोसळला. सेन्सेक्सच्या तीनअंकी घसरणीमुळे निर्देशांक बीएसईतील गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपये गमावले.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) गुरुवारी सेन्सेक्स 558 अंकांनी घसरला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 1.25 टक्क्याने कोसळून 82,626 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एसएसई) निफ्टी निर्देशांक 1.30 टक्क्याने घसरून 25,471 अंकांवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी दीड अंकाने कोसळला. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, ओएफएसएस, इन्फो एज, एल अँटी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन, हेल्थकेअरसह दोनशे कंपन्यांच्या शेअर भावाने 52 सप्ताहांतील नीचांकी पातळी गाठल्याने सेन्सेक्सचे मोठे नुकसान झाले. निफ्टी 50 निर्देशांकातील 45 कंपन्यांच्या शेअर भावात घसरण झाली. हिंदाल्को इंडस्ट्रीजचा शेअर भाव 6.08, हिंदुस्थान युनिलिव्हर 4.34, इटर्नल 4.30, अदानी एंटरप्राइजेस 3.83, ओएनजीसीच्या शेअर भावात 3.20 टक्क्यांनी घसरण झाल्याने निफ्टीचे सर्वाधिक नुकसान झाले.
रुपयाचा भाव स्थिर
एआय भीतीने निर्देशांकाची गाळण झाल्यानंतरही चलन बाजारात रुपयाचा दर टिकून होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे पडझड टळली गेली. एका डॉलरचा भाव 90.63 रुपयांवर बंद झाला.
अमेरिकेत ‘एआय’च्या भीतीमुळे विक्री, भारतीय बाजारावरही परिणाम
अमेरिकेत एआयशी संबंधित चिंता वाढल्या आहेत. नवीन टूल्स पारंपरिक आयटी सेवांच्या व्यवसायावर परिणाम करू शकतात अशी लोकांना भीती वाटत आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री दिसून आली. यास्तव अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारताच्या आयटी क्षेत्रावरही दिसत आहे. कारण, या कंपन्या अमेरिकन क्लायंट्सकडून सर्वाधिक कमाई करतात. आयटी शेअर्स घसरल्यामुळे संपूर्ण भारतीय बाजार दबावाखाली आहे.