

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईसह राज्यभर छापे टाकत मरिन लाईन्स येथील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्म प्रा. लि.चा अन्न परवाना तडकाफडकी निलंबित केला आणि लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त व नष्ट करण्यात आला.
भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक मोहीम राबवत मुंबई, पालघर, सांगली, नवी मुंबई आणि अकोलासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.
या कारवाईत मुंबईतील पारशी डेअरी फार्म प्रा. लि.च्या मरीन लाईन्स येथील आस्थापनाच्या तपासणीत गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्या. कच्च्या दुधाच्या हाताळणीपासून उत्पादन विभागातील अस्वच्छता, बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव, अपुरी वैद्यकीय नोंदी आणि लेबलिंगमधील गंभीर त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले.
पारशी डेअरीच्या पालघर येथील फार्मवरही अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून ३२.११ लाख किंमतीचा अन्नसाठा जप्त केला. या कारवाईत कुकिंग देसी काऊ बटर, मलई पनीर, कोलो स्ट्रम, फिग्स, मलई कुल्फी, स्वीट मावा, काऊ तूप व म्हैस तूप या पदार्थांचे आठ नमुने ताब्यात घेण्यात आले. इथे कोणतेही लेबल नसलेले कोलो स्ट्रम जप्त करण्यात आले. अपेक्षित दर्जा नसलेला साठाही इथे आढळून आला.
पालघर जिल्ह्यातच वसई शिव डेअरीवर धाड टाकून १८१ किलो पनीर जप्त करण्यात आले. वाशीच्या एपीएमसी मसाला मार्केटमध्येही धाड टाकून ११.२४ लाखांची हिरवी वेलची जप्त करण्यात आली. निकृष्ट दर्जा आणि दिशाभूल करणारे लेबलिंग यामुळे मोठा साठा जप्त झाला.
गोरेगाव येथे दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत ५५८ लिटर दुधाच्या ८२२ पिशव्या जप्त करून नष्ट करण्यात आल्या. गोवंडीतील सूफी डेअरीवर छापा टाकून १,६८३ लिटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध नष्ट करण्यात आले, तर संबंधित आस्थापनाला व्यवसाय बंद नोटीस बजावण्यात आली.
सांगलीतील दोन ठिकाणी भेसळयुक्त दूध तयार केल्याच्या संशयावरून दूध, रिफाइंड तेल आणि डेअरी पर्मिएट पावडरसह साहित्य जप्त करण्यात आले. नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये ₹११.२४ लाखांची हिरवी वेलचीही निकृष्ट दर्जा व भ्रामक लेबलिंगच्या संशयावरून जप्त करण्यात आली.
दरम्यान, अकोला येथे प्रतिबंधित अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून ₹१.२३ कोटींचा प्रतिबंधित अन्नसाठा, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले. राज्यभर सुरू असलेली ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असून, अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.
मुलुंडमध्ये ६१.२५ किलो चीज, पनीर आणि बर्फीचा साठा लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याने जप्त करण्यात आला. पालघरमधील पारशी डेअरीच्या उत्पादन केंद्रातून सुमारे ३२.११ लाखांचा बटर, पनीर, कोलोस्ट्रम आदी दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. वसईतील शिव डेअरीवर १८१ किलो पनीर जप्त करून कारवाई करण्यात आली.