

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या दोन अन्न आस्थापनांवर धडक कारवाई करत त्यांचे एफएसएसएआय (FSSAI) परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. ही कारवाई १ आणि ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
गिरगावातील तेवारी ब्रदर्स मिठाईवाला या आस्थापनात तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके नियमावलीतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे या आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
विक्रोळीतील श्रुती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेवरही एफडीएने कारवाई केली. ही संस्था दररोज तीन हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना अन्नपुरवठा करते. तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेचा एफएसएसएआय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
दरम्यान, ३० जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत बृहन्मुंबई विभागात प्रतिबंधित पान मसाला व गुटखाविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. दोन आस्थापनांवर कारवाई करून २६.५५ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली. एका आस्थापनेला सील करण्यात आले, तर २५ लाख रुपये किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.