

मुंबई: गोवंडी शिवाजीनगर येथील मुस्कान एन. आयसीयू ॲण्ड चिल्ड्रन हॉस्पिटल येथे एफडीएने केलेल्या तपासणी दरम्यान रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश रजनीकांत शाह यांनी रुग्णालयातील दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अलोपॅथिक औषधांचा साठा करून ठेवलेला आढळून आला. तसेच, संबंधित औषधांची विक्री वैध औषध विक्री परवान्याविना रुग्णालयातील बारावी उत्तीर्ण रिसेप्शनिस्टमार्फत विक्री बिलांच्या आधारे केली जात असल्याचे निदर्शनास आले.
आणखी कसून तपासणी केली असता रुग्णांना काउंटरवरून औषध विक्री करणे तसेच औषध विक्रीची बिले तयार करणे यासाठी आवश्यक तांत्रिक पात्रता किंवा फार्मसी व्यवसायाशी संबंधित वैधानिक पात्रता नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. ही बाब औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियमांतील तरतुदींशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कारवाई दरम्यान रुग्णांना औषधविक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे बिल बुक जप्त करण्यात आले. तपासणीत असे आढळून आले की, संबंधित बिलांमध्ये केवळ रुग्णाचे नाव, दिनांक, औषधाचे नाव व आकारलेली रक्कम यांचा उल्लेख करण्यात आला होता.
तथापि, औषधांचा बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक, उत्पादकाचे नाव तसेच इतर आवश्यक वैधानिक तपशील नमूद करण्यात आलेले नव्हते. ही बाब ग्राहक संरक्षण तसेच औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचे आढळून आले.
या तपासणी आणि चौकशीत मुस्कान एन. आयसीयू ॲण्ड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये विक्रीसाठी साठवलेला ॲलोपॅथिक औषधसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ९ लाख ९,२१५ रूपये किंमतीचा औषधसाठा जप्त केला असून, पुढील तपास पूर्ण करून सर्व संबंधितांविरुद्ध औषधे व प्रसाधने अधिनियम, १९४० व त्याअंतर्गत नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड अन्न व औषध प्रशासन सहन करणार नाही. वैध परवान्याविना औषधांची विक्री, अपात्र व्यक्तींमार्फत औषध वितरण तसेच औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक औषध विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत आणि प्रत्येक खरेदीवेळी वैधानिक तपशील असलेले बिल घेण्याची दक्षता घ्यावी.
-तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन