मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे अभियान 11 ऑगस्टपासून हाती घेतले असून आतापर्यंत 42 आस्थापनांची तपासणी केली. यात तब्बल 218 किलोचे बनावट पनीर व 478 लिटर दूध नष्ट केले आहे. त्यामुळे पनीरसह मिठाई, खवा, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा या खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गणशोत्सवात या खाद्यपदार्थांना मागणी वाढते. मात्र भेसळयुक्त व बनावट पदार्थ विक्री करून व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे 11 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेतली आहे. 25 ऑगस्ट रोजी एफडीए व मुंबई पोलीस यांनी अँटॉप हिल येथे केलेल्या कारवाईत लेबल नसलेल्या चीज नालॉग या पनीर सदृश्य अन्न पदार्थाची विक्री होत असल्याचे आढळले.
या ठिकाणाहून चीज नालॉगचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन 54 हजार 625 रुपयांचा 218 किलो वजनाच्या चीज नलॉगची पनीर म्हणून विक्री होऊ नये यासाठी तो नष्ट करण्यात आला. 19 ऑगस्ट रोजी दहिसर पूर्व येथे धाड टाकून विविध कंपन्याच्या पॅक्ड दूधाचा 29 हजार 277 किमतीचे 478 लिटर इतका दूध साठा नष्ट करण्यात आला. वरील सर्व नमुने विश्लेषणा करिता प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
मिठाई खरेदी करताना काळजी घ्या
मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी पाकीटावर बॅच नंबर, लॉट नंबर, युज बाय डेट तसेच उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक इत्यादी माहिती बघून तपासूनच खरेदी करावे. त्याबाबतची खरेदी बिल घेण्यात यावी जेणेकरून फसवणूक होणार नाही. अशा स्वरूपाची माहिती नसेल तर पदार्थ खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. आपण घेत असलेली मिठाई ताजी व सकस आहे का याची खातरजमा करावी.
नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास किंवा कुठेही मावा अथवा खवा चांगल्या दर्जाचा वापरला जात नाही असे निदर्शनास आल्यास त्याबाबत सविस्तर माहिती 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.
ज्या आस्थापनांमध्ये तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
मंगेश माने, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन