महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व फडणवीसच करणार

महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व फडणवीसच करणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून, तेच राज्याचे नेतृत्व करतील. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली.

बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना राज्यात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी ते म्हणाले की, ज्या मतदारसंघांत महायुतीचा उमेदवार अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा आणि विचारविनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असेही ते म्हणाले.

शरद पवार यशाने हुरळले

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेलाही बावनकुळे यांनी उत्तर दिले. यशाने ते थोडे हुरळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती खालच्या पातळीवर टीका करण्यात आली, याचाही अभ्यास शरद पवार यांनी केला पाहिजे. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिपणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली, असे बावनकुळे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news