

मुंबई : देशात टाळेबंदी लागणार नाही, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तरीही आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही लोक जाणीवपूर्वक देशात टाळेबंदी लागेल, असा संभ्रम पसरवत आहेत. अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
पश्चिम आशियाई देशातील युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दृरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
यासंदर्भात फडणवीस यांनी शनिवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, लॉकडाऊन लागणार नाही, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तरीही अशी खोटी माहिती पसरविली जात आहे. त्यामुळे अशी माहिती कुठल्याही सोशल मीडियावर टाकल्यास किंवा खोट्या पोस्ट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठविल्यास तो गुन्हा ठरणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले असतानाही भारत सरकारने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
शेजारच्या देशात गंभीर परिस्थिती
भारताच्या शेजारील काही देशांमध्ये इंधनटंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश यांसारख्या देशांमध्ये गॅस व पेट्रोलच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवावी लागली आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. अशा परिस्थितीत भारतात मात्र इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले असून, यासाठी प्रभावी व्यवस्थापन केल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.