

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ६ डिसेंबर रोजी शपथ घेतली. याचवेळी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार करून खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर फडणवीस सरकारने आज (दि.३१) पुढील १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातील माहिती X अकाऊंटवरून दिली आहे.
फडणवीसांनी सह्याद्री अतिथिगृह येथे पुढील १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना कृती कार्यक्रमांसह सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला जुने वाहन स्क्रॅपिंग व नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण, रस्ते अपघात कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर, परिवहन सेवेला गती देण्याच्या उपाययोजना सूचना केल्या आहेत. तसेच पुढील विभागांनादेखील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
चित्रीकरणासाठी ऑनलाईन 'एक खिडकी' परवानगी देण्यात यावी, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट निर्मिती करणे, तसेच ‘हर घर संविधान’ मोहिमेदवारे प्रत्येक घरात संविधान पोहोचविणे.
१३ लाख घरकुलांसाठी ४५० कोटींचा पहिला हप्ता लवकरच वितरित करणे, ग्रामीण रस्ते दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे करणे. महाआवास अभियानाअंतर्गत प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करणे.
स्थलांतरित मजुरांसाठी स्मार्ट रेशनकार्ड करणे, केवायसी प्रमाणीकरण करणे. ‘एक गाव एक गोदाम’ आणि ‘एक देश, एक शिधापत्रिका’ धोरण राबविणे
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणे, स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करणे, हातमाग विणकरांना निवृत्ती वेतन योजनेद्वारे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणे, आदीचा कृती कार्यक्रमांत समावेश आहे.