

Devendra Fadnavis reaction Operation Sindoor
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलरोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की याचे उत्तर दिले जाईल. हा नवीन भारत अशा प्रकारे हल्ले सहन करणार नाही, हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिले आहे. भारतीय लष्कराने आज पाकला प्रत्युत्तर दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विशेषत: मुंबईत ज्यांनी हल्ला केला ते हाफिज आणि डेव्हिडचे अड्डे देखील नष्ट करण्यात आले आहेत. ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. आणि विशेषता पहलगाम मध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आले. त्याचा संताप संपूर्ण भारतात होता. ज्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम दहशतवाद्यांनी केले. त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम ऑपरेशन सिंदूरने केले आहे.
राफेल आणि तत्सम यंत्रणेवर ज्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना या कारवाईने उत्तर मिळाले आहे. त्यामुळे त्यांना शब्दांनी उत्तर द्यायची काही गरज नाही. हे केवळ मूर्ख आहेत आणि मूर्खच आहेत. आज पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सेनेने केले आहे. पहिल्यांदा हे ऑपरेशन अत्यंत टार्गेट ठरवून करण्यात आले. भारताने गेल्या १४ दिवसांत सगळ्या देशाशी संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे, त्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण जग देखील आपल्या पाठीशी उभे आहे. संपूर्ण भारतातील जनता पाठीशी उभी आहे. आणि आज पाकिस्तानात केलेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा साऱ्या जगाला भारताची ताकद दाखवून दिली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. त्याबद्दल लष्कराचे मी आभार आणि अभिनंदन करतो.