पुढारी ऑनलाईन डेस्क : एस्सार समुहाचे (Essar Group) सह-संस्थापक अब्जाधीश उद्योगपती शशिकांत रुईया (Shashikant Ruia passes away) यांचे सोमवारी (दि. २६) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रुईया यांचे २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. एक महिन्यापूर्वी ते अमेरिकेतून परतले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
त्यांचे पार्थिव आज (दि. २६ नोव्हेंबर) दुपारी १ ते ३ दरम्यान रुईया हाऊसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर दुपारी ४:३० वाजता तीन बत्ती, मलबार हिल, मुंबई येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी मंजू आणि दोन मुले प्रशांत आणि अंशुमन असा परिवार आहे.
शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''शशीजींच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती.'' असे पीएम मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
“अत्यंत दुःखद अंतकरणाने कळविण्यात येत आहे की, रुईया आणि एस्सार कुटुंबांचे प्रमुख शशिकांत रुईया यांचे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. लाखो लोकांवर त्यांचा प्रभाव राहिला. नम्र, प्रेमळपणा आणि त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना खरोखरच एक असाधारण नेता बनवते,” असे निवेदनात म्हटले आहे.
पहिल्या पिढीतील उद्योजक शशिकांत रुईया यांनी १९६९ मध्ये त्यांचा भाऊ रविकांत रुईया (उर्फ रवी रुईया) यांच्यासोबत एस्सारची स्थापना केली. त्यांनी १९६५ मध्ये वडील नंद किशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा मद्रास पोर्ट ट्रस्टकडून बंदरात बाह्य ब्रेकवॉटरच्या बांधकामासाठी २.५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळविली. आज एस्सार समुहाचा विस्तार स्टील, ऑईल रिफायनिंग, शोध आणि उत्पादन, टेलिकॉम, पॉवर आणि कन्स्ट्रक्शन यासह विविध क्षेत्रांमध्ये झाला.
सुरुवातीच्या काळात एस्सार समुहाने बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पूल, धरणे आणि वीज प्रकल्पांसह अनेक मोठे पायाभूत प्रकल्प उभारले. १९८० च्या दशकात एस्सारने अनेक तेल आणि वायू मालमत्ता मिळवून ऊर्जा क्षेत्रात विविधता आणली.