Engineering seats Maharashtra: पॉलिटेक्निक-इंजिनिअरिंगच्या जागा यंदा दहा टक्के वाढणार

पारंपरिक शाखांकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पवन होन्याळकर

मुंबई: राज्यातील तंत्र शिक्षण क्षेत्रात यंदा पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांत कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सिक्युरिटी आणि आयओटीसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिल्याने अनेक नामवंत महाविद्यालयांमध्ये जागा अपुऱ्या पडल्या होत्या.

मात्र, दुसरीकडे आयटी क्षेत्रातील बदलती रोजगारस्थिती, वाढती स्पर्धा आणि पारंपरिक उद्योग क्षेत्रातील नव्या संधी लक्षात घेता मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसारख्या पारंपरिक शाखांकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Admission
Mumbai airport cocaine seizure: आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वाअकरा कोटींचे कोकेन जप्त

राज्यातील तंत्रशिक्षण पदविका अर्थात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. कॉम्प्युटर इंजिनिअरींग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांबरोबरच ‌‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी‌’लाही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली होती.

दहावीनंतर थेट कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे प्रवेश आकडेवारीवरून स्पष्ट झाले. राज्यातील सुमारे 400 पॉलिटेक्निक संस्थांमध्ये 1 लाख 22 हजार 324 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी तब्बल 1 लाख 07 हजार 545 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते.

सर्वाधिक प्रतिसाद कॉम्प्युटर इंजिनिअरींगला मिळाला असून या शाखेत 20 हजार 905 प्रवेश झाले होते. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरींगला 20 हजार 593, सिव्हिल इंजिनिअरींगला 16 हजार 441, तर इलेक्ट्रिकल शाखेत 15 हजार 768 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मुंबई विभागात कॉम्प्युटर इंजिनिअरींगला 2 हजार 999, मेकॅनिकलला 2 हजार 549, तर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीला 1 हजार 224 विद्यार्थ्यांनी पसंती दिली होती.

Admission
Edible oil price rise: देशात खाद्यतेलाचा दर 10 वर्षांत दुपटीहून अधिक

पुणे, नाशिक आणि मुंबईसारख्या शहरी विभागांत आयटी आणि कॉम्प्युटर शाखांचा प्रभाव अधिक दिसून आला, तर अमरावती आणि नागपूर विभागात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखांचा प्रभाव कायम राहिल्याचे दिसूनआले.

गेल्या सात वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 1 लाख 49 हजार 078 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना पसंती दिली होती. राज्यात 1 लाख 80 हजार 170 जागा उपलब्ध असताना प्रवेशसंख्येत मोठी वाढ झाली होती.

विशेषतः कॉम्प्युटर इंजिनिअरींग शाखेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली. बहुतांश महाविद्यालयांतील या शाखेच्या जागा पूर्ण क्षमतेने भरल्या होत्या. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, आयओटी, डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अभ्यासक्रमांनाही मोठी मागणी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news