

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येणार्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत दुसर्या फेरीची निवड यादी 11 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत अपेक्षेप्रमाणे प्रवेश मिळूनही प्रतिसाद न दिल्याने या यादीत किती प्रवेश मिळतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, दुसर्या फेरीसाठी अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची मुदत 6 ते 8 ऑगस्टदरम्यान होती. या कालावधीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनद्वारे एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवले आहेत आता या पसंतीक्रमांच्या आधारे 11 ऑगस्ट रोजी उमेदवारांच्या लॉगिनवर महाविद्यालय प्रवेश निवड यादी उपलब्ध होणार आहे.
दुसर्या फेरीत नाव आलेल्या उमेदवारांना 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत सीट स्वीकारून फी भरावी लागेल. पहिल्या तीन पसंतींपैकी जागा मिळालेल्या उमेदवारांचा प्रवेश आपोआप ‘फ्रीझ’ होणार असून, अशा विद्यार्थ्यांना पुढील फेर्यांत संधी मिळणार नाही. पहिल्या तीन पसंतींपेक्षा इतर जागा मिळालेल्या आणि ‘सेल्फ फ्रीझ’ करणार्यांनाही पुढील फेर्यांत सहभागी होता येणार नाही. तर पहिल्या तीन पसंतींपेक्षा इतर जागा मिळालेल्या आणि ‘बेटरमेंट’ पर्याय निवडणार्यांना पुढील फेरीत सुधारित संधी मिळणार आहे.
पहिल्या फेरीतील आकडेवारीनुसार, 1 लाख 44 हजार 776 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असूनही केवळ 32 हजार 635 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. यापैकी 15 हजार 852 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. अंतिम मुदतीत कमी प्रतिसादामुळे एक दिवसाची मुदतवाढ द्यावी लागली. या वाढीव कालावधीत 6 हजार 985 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. लोकप्रिय अभ्यासक्रमांकडेच अधिक कल असल्याने इतर शाखांतील जागा रिक्त राहिल्या आहेत.